बेंगलोरच्या श्रीनिवास रेड्डी यांच्याशी साधर्म्य
कणकवली पोलिसांचे पथक बेंगलोरकडे रवाना; पोलिसांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते. या तपासांती पोलिसांना हा मृतदेह बेंगलोर (कर्नाटक) येथील श्रीनिवास रेड्डी (वय ५३) यांचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मिळाला आहे.
मात्र, तपास सुरू असल्याचे कारण देत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
गुरुवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेत खून झालेल्या इसमाचे डोके व छातीचा भाग कुजलेला होता, तसेच शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही, कणकवली पोलिसांनी तपासाची गती वाढवत बेंगलोरशी संपर्क साधला.
गुप्त माहितीच्या आधारे बेंगलोरमधील दोन व्यक्तींना संपर्क साधण्यात आला. या दोघांनी कणकवलीत येऊन मृतदेह पाहिल्यानंतर तो श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे मान्य केले, मात्र ते नातेवाईक नसल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर पोलिसांचे एक पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या कुटुंबीयांना घेण्यासाठी बेंगलोरला रवाना झाले असून, त्यांच्या आगमनानंतरच मृतदेहाची ओळख अधिकृतरीत्या निश्चित होईल, अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी दिली.
दरम्यान, दोडामार्ग येथे सापडलेल्या रक्त लागलेल्या कारचा या खूनप्रकरणाशी काही संबंध आहे का, याविषयीही पोलिसांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
सध्या पोलिसांचे लक्ष मृतदेहाची अधिकृत ओळख पटविणे आणि खुनाचा सूत्रधार शोधण्यावर केंद्रित असून, पुढील २४ ते ४८ तासांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













