देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील फणसे येथील समुद्रात मासेमारीदरम्यान नौकेवरून बेपत्ता झालेला सुरज सूर्यकांत आचरेकर (३०, रा. मोंड झरकरवाडी) या खलाशाचा मृतदेह दोन दिवसांनी रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज आचरेकर हा ‘बन्सी” नौकेवर खलाशी म्हणून कामाला होता. १ मे रोजी रात्री १२ वाजता ते पहाटे ५ वाजण्याच्या कालावधीत फणसे समुद्रात बन्सी नौका मासेमारीदरम्यान नांगर टाकून उभी करण्यात आली होती. या दरम्यान खलाशी सुरज आचरेकर हा बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार हितेश संजय हरम (२६, रा. देवगड किल्ला) यांनी देवगड पोलिसांत दिली होती.












