श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणाचा तपास वेगात; बेंगलोरमधून तीन संशयित ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे आढळलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या खूनप्रकरणाचा तपास गतीमान झाला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेंगलोरमध्ये सोमवारी रात्री तब्बल तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे पथक या तिघांना घेऊन कणकवलीकडे रवाना झाले असून, मंगळवार सायंकाळपर्यंत ते येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

या खूनप्रकरणाने आता हाय प्रोफाईल वळण घेतले असून, आणखी काही जणांचा यात सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार दिवसांपूर्वी महामार्गालगत साळीस्ते गावाजवळ गणपती सान्याच्या पायरीवर श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी रेड्डी यांच्या आईच्या नावे असलेली कार दोडामार्ग परिसरात सापडली होती. कारच्या आतील भागात रक्ताचे डाग आढळल्याने दोन्ही घटनांचा संबंध स्पष्ट झाला. या धागेदोऱ्यांच्या आधारे एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी बेंगलोर गाठून तीन दिवस गुप्त तपास केला. अखेर सोमवारी रात्री संशयितांच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मालमत्तेवरील वादातूनच हा खून घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेड्डी यांचा खून साळीस्ते परिसरातच करून आरोपींनी मृतदेह तेथे टाकला आणि त्यांची कार दोडामार्ग भागात सोडून पळ काढला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून चौकशी सुरू असून, पुढील काही तासांत या खुनामागील नेमके कारण आणि मुख्य सूत्रधार उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासातील कार्यक्षम भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.