नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर व संख्या देखील जास्त वाढल्याने लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण गल्ली बोळात झुंड करून राहणारे हे कुत्रे सर्व सामान्य नागरिकावर केव्हाही हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच भटक्या कुत्र्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर यांनी दिली.
खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर, पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, पशु वैद्यकीय अधिकारी किरण पवार, खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, खारेपाटण चे माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रा पं. सदस्य सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, जयदीप देसाई, क्षितिजा धुमाळे, मनाली होणाळे, सौ अस्ताली पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून याबाबत माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांना कार्यवाही करण्याबाबत शासन आदेश असून भटक्या कुत्र्यांबाबत ग्रामंचपामचायत स्तरावर अशा प्रकारची कार्यवाही करण्यात यावी. तसेच याकरीता जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी अनुदान द्यावे अशी लक्षवेधी मागणी या सभेत केली.
तर आजच्या सभेत भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे, लसीकरण करणे व जंतुनिर्मुलन करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, पशु वैद्यकीय अधिकारी किरण पवार व खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी सहभाग घेतला. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत राज अभियान अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास खारेपाटण मधील सर्व नागरिकांनी सहकार्य करा असे आवाहन खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी केले आहे.












