विलवडेजवळ पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; पाचही जण बचावले

ओटवणे (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली मार्गावर विलवडे ग्रामपंचायत हद्दीत दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. ओहोळात कार कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने पाचही प्रवासी बचावले असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

एमएच 12 एक्सएक्स 3725 क्रमांकाची सुजुकी स्विफ्ट कार पुणे येथून गोवा येथे पर्यटनासाठी निघाली होती. कारमध्ये पाच युवक प्रवास करत होते. अपघातात दोघांच्या हाताला व पायाला दुखापत झाली.

समोरून येणाऱ्या उन्हाचा झोत डोळ्यांवर पडल्याने अपघात झाल्याचे पर्यटकांनी सांगितले. मात्र या भागात सातत्याने अपघात घडत असून रस्त्याची दुरवस्था आणि अरुंद रस्ता ही प्रमुख कारणे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अरुंद रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून मोठी जीवितहानी टळत असली तरी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

सध्या या भागात रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र काही कारणांमुळे काम बंद असल्याने ते तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व सुसज्ज करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.