दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील २५ गावांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या परिसरात प्रस्तावित प्रदुषित प्रकल्पांना चाप बसणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून मंगळवारी केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. गेल्या २०१० पासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा लढा सुरू ठेवलाहोता. या अधिसूचनेमुळे आता या गावांमध्ये खाणकाम, लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे
जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. वर्षभराच्या आत ही समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या गावांचा झाला समावेश केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ती, कुंभवडे, खडपडे, तळकर, झोळबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल, पणतूर्ती, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे- पडवे माजगाव या गावांचा यात समावेश आहे.












