कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी प्रसिद्धीपत्रातून दिली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सतत कार्यरत असून लवकरच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.












