कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ व ख्रिश्चन धर्म प्रसारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे दाखल झाले. त्यांनी ख्रिश्चन धर्म प्रसारकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले, त्यामुळे काही वेळाने वातावरण निवळले. ग्रामस्थानी पोलीस निरीक्षकांकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुका मिलिंद मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, अनुप वारंग, परेश आचरेकर, समर्थ कोरगावकर, पपू यादव, सदानंद चव्हाण विनय गुरव सागर पवार, प्रणय शिर्के, सुरज लोके, प्रसाद देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ख्रिश्चन धर्म प्रचारक अतुल भोरे व उषा भोरे यांना तुम्ही इथे काय करता ? एकाच धर्माचा प्रसार का करता? जर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असाल तर एक तरी ख्रिश्चन आलेला आहे का? हिंदू धर्म यांना बोलून या ठिकाणी खोटी अमिषे दाखवून दाखवा त्यांचं धर्मांतर करायचा आहे का? या अमिषाना गोरगरीब लोक बळी पडत असल्याचा आरोप सरपंच संदीप मेस्त्री व स्वप्निल चिंदरकर यांनी केला. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत त्याची फिर्याद पोलिसांनी द्यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरील काही व्यक्ती कलमठ गावात येऊन स्थानिक नागरिकांना प्रलोभने दाखवत धर्मांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. यानंतर गावकऱ्यांनी तातडीने एकत्र येत संबंधितांना जाब विचारला व हा प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, पोलीस उपनिरीक्षक सागर कांबळे, हवालदार सुधीर घारकर, किरण कदम, सागर जाधव, श्रीकांत महामुनी यांच्यासह महिला पोलीस उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली आहे.












