सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आदिशक्ती अभियान मध्ये ग्रामपंचायत कळसुली जिल्ह्यात द्वितीय आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सन 2025 मधील आदिशक्ती अभियान स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात कळसुली ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे.

आदिशक्ती अभियानांतर्गत आवश्यक सर्व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून अभियानातील विविध उपक्रम कळसुली ग्रामपंचायतीने यशस्वीपणे पूर्ण केले. या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कार्यामुळेच ग्रामपंचायतीला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

या यशाबद्दल ग्रामपंचायत कळसुलीचे सरपंच श्री. सचिन पारधीये यांनी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुली गावाने हा पुरस्कार मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.

या यशामध्ये ग्रामपंचायत कळसुलीचे सरपंच श्री. सचिन पारधीये, ग्रामसेवक श्री. प्रशांत वर्दम, समितीचे अध्यक्ष, गावातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा मान मिळाल्याने गावकऱ्यांकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.