वैभववाडीत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा वैभववाडी यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या समस्या, प्रश्न याबाबत गेली अनेक वर्षे शासन दरबारी मांडणारे व ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले शिक्षक नेते शरद नारकर यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाराम देसाई व प्रमुख पाहुणे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. पेन्शन धारकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अहोरात्र कार्यरत राहील असे प्रतिपादन शरद नारकर यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षस्थानी सखाराम देसाई, प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, सचिव नितीन जठार तसेच संतोष कदम, प्रकाश साळुंखे, रामचंद्र अडूळकर, श्रीधर रावराणे, मधुसूदन कदम, सुप्रिया परब, पुनम कदम, अरुण पंडित, रघुनाथ बोभाटे, नाना तांबे, मनोहर साटम, आदी सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्व सन्मानचिन्हे युवा उद्योजक व समाजसेवक सुनिल नारकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास रावराणे यांनी केले.












