खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप बंद

ऐन दिवाळीत खारेपाटण मध्ये मात्र अंधार

महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीच्या सणात सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळला जात असतानाच खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्सवेल ब्रीज तसेच मार्गावरील मुख्य पथदीप गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत असून हायवे प्राधिकरणाने देखील याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याने ऐन दिवाळीत सर्वत्र अंधार असल्याचे सध्याचे चित्र आहे.यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग हा खारेपाटण शहरातून जात असून या मार्गांवरील पथदीप हे गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.यामुळे खारेपाटण परिसरात चोरट्याकडून घर फोडी घडण्याचे प्रकार देखील वाढू लागले आहेत.याबरोबरच खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजच्या दुतर्फा असलेले पथदिवे व बॉक्सवेल अंडरपास मध्ये असलेले विद्युत दिवे बंद आहेत.याबरोबरच खारेपाटण रामेश्वर नगर ते संभाजी नगर टाकेवाडी खारेपाटण पर्यंत असणाऱ्या खारेपाटण मधील प्रमुख शहरी महामार्गावर विद्युत दिवे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करून येणारे प्रवासी यांना काळोख्या अंधारात उतरावे लागत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक महिला वर्ग यांच्या मनात सुरक्षेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारेपाटण ग्रामस्थ व स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने महिन्याभरा पूर्वी राष्ट्रीय महामार्ग सर्वांजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर खारेपाटण वर मोर्चा नेऊन याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता.मात्र आश्वासनाच्या पलीकडे अधिकाऱ्याने काही न देता नागरिकांच्या समस्यांना पाने पुसण्याचा प्रकार केला असल्याचे दिसत आहे. तर महामार्ग प्राधिकरणाच्या खारेपाटण कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अभियंता बी जी कुमावत हे खारेपाटण मधील हायवेशी संबधीत समस्या सोडविण्या ऐवजी त्या वाढवीन्यायाच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचा आरोप खारेपाटण ग्रा.पं.सदस्य श्री जयदीप देसाई यांनी केला आहे.

जर खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असलेली अपूर्ण कामे तातडीने पूर्ण न केल्यास खारेपाटण वासियांच्या वतीने पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे.