कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दशावतारी नाटके व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवात रोज रात्री ८.३० वाजता पुराण वाचन, ९ वाजता ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक व १० वाजता कीर्तनकार भास्कर बुवा उर्फ राजू मुंडले यांचे कीर्तन होणार आहे. ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जय हनुमान दशावतार मंडळ (शरद प्रस्तुत, आरोस-दांडेली) चे ‘शिव मंगळागौरी’ नाटक, १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री देवी भूमिका लोककला मंडळ (नितीन आसयेकर प्रस्तुत, मोचेमाडकर मळगाव-सावंतवाडी) चे संत सद्गुरु बाळूमामा-भाग २’ (पूर्वाध) नाटक, २ रोजी पहाटे ४.३० वाजता पुराण वाचन, ५ वाजता हनुमान जन्मावर कीर्तन, सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी हनुमान जन्म, त्यानंतर प्रसाद वाटप (सुंठवडा) तसेच ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक (श्री मारुती मंदिर ते श्री देव कुडाळेश्वर मंदिर व तेथून पुन्हा श्री मारुती मंदिर), सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठलादेवी दशावतार मंडळ (राठिवडे-मालवण) चे ‘भक्ती महिमा’ नाटक, रात्री १२ वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार मंडळ (नेरुर) चे ‘ऋषकपी’ नाटक होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव मारुती नगर-ब्राह्मण देवस्थान समिती (कुडाळ) च्यावतीने करण्यात आले आहे.












