प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त १६ क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील माड्याचीवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ सादर करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या ‘१०० दिवस टीबी मुक्त अभियान’ अंतर्गत, श्री सदगुरु भक्त सेवा न्यासाच्या वतीने तालुक्यातील १६ क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी आवश्यक असणारा पूरक पोषक आहार आणि अन्नधान्य साठा देऊन दत्तक घेण्यात आले. विशेष म्हणजे, २०२३ पासून सलग तीन वर्षे ही संस्था ‘निक्षय मित्र’ म्हणून क्षयरुग्णांना सातत्याने मदत करत असून, या स्तुत्य उपक्रमामुळे रुग्णांच्या आरोग्याला मोठा आधार मिळत आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याने अध्यात्म आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणला असून परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.