कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभकरण्यात आला.
एसटीच्या कारभारात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बैंक यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लिमिटेड कंपनीकडून कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड काढण्याच्या सुविधेचा प्रारंभकरण्यात आला. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ प्रवाशांसाठी तसेच इतर प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. या सेवेच्या शुभारंभप्रसंगी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक जयेश धुमाळे, बसस्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, कंपनीचे कणकवली प्रतिनिधी रूपेश जाधव, एसटी महामंडळाचे कर्मचारी बोभाटे, पावसकर उपस्थित होते. यावेळी संदेश पारकर यांनी एसटीची सेवा चांगल्याप्रकारे मिळण्यासाठी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.












