चारापाणी खर्च भरल्याशिवाय वाहन मिळणार नाही
कणकवली (प्रतिनिधी) : कत्तलीच्या उद्देशाने गाय व बैलांची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आरोपी समीर मधुकर सावंत याला अटक करून त्याचे वाहन (एमएच ०६ एजे ४३१२) टाटा इंट्रा व्ही-३० जप्त केले. तसेच जप्त केलेली जनावरे वैभववाडी येथील गाय-वासरू गोशाळा, खांबाळे येथे देखभालीसाठी ठेवण्यात आली होती.
दरम्यान, आरोपी समीर सावंत याने जप्त वाहन परत मिळवण्यासाठी कणकवली येथील न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जास गाय-वासरू गोशाळा, खांबाळे यांच्या मार्फत हरकत अर्ज सादर करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत स्पष्ट केले की, जनावरांच्या पालनपोषणासाठी दररोज २०० रुपये या प्रमाणे गुन्हा घडल्याच्या दिवसापासून ते वाहन ताब्यात घेईपर्यंतचा संपूर्ण चारापाणी खर्च गोशाळेकडे जमा केल्याशिवाय संबंधित वाहन अर्जदाराच्या ताब्यात देण्यात येणार नाही.
सदर कालावधीतील एकूण खर्चाची रक्कम सुमारे २ लाख १७ हजार रुपये इतकी ठरते.
तसेच न्यायालयाने अर्जदारास १५ लाख रुपयांचा सुपूर्तनामा सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, गोरक्षणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व कडक निर्णय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात हरकतदार गाय-वासरू गोशाळा, खांबाळे यांच्यातर्फे अॅड. राजू गुप्ता, प्राणी कल्याण अधिकारी सचिन झुंजारराव, अॅड. पलाश चव्हाण (मालवण), अॅड. के. शर्मा, अॅड. समीर गवाणकर, अॅड. हेमेंद्र गोवेकर, अॅड. मकरंद नातू, अॅड. कुणाल लाड व अॅड. गौतमी गावकर यांनी काम पाहिले.












