कोष्टेवाडीतील हनुमान जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथील श्री हनुमान नगर परिसरात यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हनुमान मित्रमंडळ कोष्टेवाडी यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला.

उत्सवाची सुरुवात सकाळी श्री हनुमान जन्मसोहळ्याने झाली. त्यानंतर महाअभिषेक व पूजापाठ पार पडले. दुपारी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर हरिपाठ व महाआरती भक्तीमय वातावरणात पार पडली. रात्री वारकरी भजन व ढोल वादनाने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.
संपूर्ण दिवस परिसरात भक्तीचा उत्साह पाहायला मिळाला असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव यशस्वी केला.