देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेज रोड परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर आणि शाखा अभियंता छाया परब यांना जाब विचारला.
सदर परिसरातील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र बिघाड झाल्यानंतर तत्काळ दुरुस्ती किंवा रोहित्र बदलण्याची कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दुपारपर्यंतही रोहित्र बदलण्यात आले नसल्याने ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात तालुका सचिव योगेश चांदोसकर, युवा मोर्चा अध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर, व्यापारी संघाच्या महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळस्कर, व्यापारी बाळा जगताप, आनंदा रामाने, राजू भानुषाली, प्रफुल्ल भावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
वीजपुरवठा खंडित झाल्याचा गंभीर परिणाम आरोग्य सेवांवरही झाला. देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा देणे कठीण झाले असून डायलिसिस सेवा ठप्प झाली होती. तसेच अनेक रुग्णांना उपचारात अडचणी निर्माण झाल्या. सुनील आठवले यांच्या रुग्णालयातही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
याशिवाय, सतत वीज खंडित झाल्यामुळे आईस्क्रीम विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. काल दिवसभरात तब्बल 17 ते 18 वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. तरीही दुसऱ्या दिवशीपर्यंत वीज सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी तसेच महावितरणने आपली सेवा सुधारावी, अशी ठाम मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.












