देवगड (प्रतिनिधी) : दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल ग्राज्युएट फिजिक्स एक्झामिनेशन (NGPE) मध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. कु. नुपूर मकरंद लळित (तृतीय वर्ष), कु. प्रेरणा शंकर गोसावी (तृतीय वर्ष) व कु. आर्यन रामदास गुरव (प्रथम वर्ष) या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर टॉप १% विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे. पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील करिअरमध्ये या परीक्षेतील यश महत्वाचे समजले जाते. सदर NGPE ही परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. भारतभरातून ३०९२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यामध्ये देवगड महाविद्यालयातील फिजिक्स विभागाचे १२ परीक्षार्थी होते. विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले प्रथम ते तृतीय वर्षाचे भौतिकशास्त्राचे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. यावर्षी ही परीक्षा भारतातील 151 केंद्रावर घेण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना ‘इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स’ IAPT कडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले आहे. भौतिकशास्त्र प्राध्यापिका डॉ. सुनेत्रा ढेरे व विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण सुरवसे यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे व अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भालचंद्र मुंबरकर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.












