ए आय च्या युगातही डॉ आंबेडकरांचे विचार दिशा दर्शक

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) : आंबेडकरी चळवळीने प्रत्येक टप्प्यावर आत्मपरीक्षण करून नव्याने फेरमांडणी करणे आवश्यक आहे. आजच्या एआयच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन असून शिक्षणाबरोबर शीलालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल जाधव यांनी केले.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, हरिष कांबळे, रुचिता कदम, ऋचा पवार, स्मिता पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पूजापाठाने झाली. यामध्ये बौद्धाचार्य राकेश जाधव, महेंद्र यादव, मंगेश कांबळे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर स्मारक ते मच्छी मार्केट अशी भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली. पांढरे वस्त्र, निळी टोपी आणि पंचरंगी मफलर परिधान करून सहभागी झालेल्या अनुयायांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भर उन्हातही अबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शहरात जयघोषांनी उत्सवी वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस रवींद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव शरद कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मारुती कांबळे यांनी केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, जि.प. सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, तालुका सरचिटणीस रितेश सुतार आदी मान्यवरांनी स्मारक भवनास भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.