Breaking News

राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डेच्या तिघांचे घवघवीत यश

दत्तात्रय मारकड, दुर्गेश गोसावी व मयुरेश नारकर यांचे अमरावती येथील परीक्षेत यश

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, नागपूर व अमरावती आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच राज्यस्तरीय आट्यापाट्या खेळाडू दुर्वेश गोसावी व मयुरेश नारकर यांनी उल्लेखनीय यश संपादन करून कासार्डे परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय पंच परीक्षा व कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू, प्रशिक्षक व पंच सहभागी झाले होते. परीक्षेदरम्यान आट्यापाट्या खेळाचे अद्ययावत नियम, पंचांचे कर्तव्य, स्पर्धा व्यवस्थापन तसेच खेळातील तांत्रिक बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पंच अमरकांत चकोले, शरद गव्हार आणि महेंद्र काळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीधर धाकुलकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्वेश मेन यांनीही आपल्या अनुभवाच्या आधारे मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षार्थीना पंच म्हणून आवश्यक असलेल्या कौशल्यांची प्रभावी माहिती मिळाली.

दत्तात्रय मारकड, दुर्वेश गोसावी व मयुरेश नारकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आट्यापाट्या खेळाला नवी प्रेरणा मिळणार आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीधर धाकुलकर, डॉ. नितीन चव्हाळे तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कासार्डे विकास मंडळ मुंबई सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही राणे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनीही यशस्वी पंचाचे अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय पंच परीक्षेत मिळालेल्या या यशामुळे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आट्यापाट्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, कासार्डेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पंच होण्याचा मान या तीघांना मिळाला आहे. या तिन्ही राज्य पंचाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.