वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन
मोफत आरोग्य शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या जीवनात व बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्भवलेल्या आरोग्य विषयक समस्यांचे वेळीच उपचार व योग्य निदान होणे गरजेचे असते अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेत शिकणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व नातेवाईक तसेच वैभववाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे योग्य मार्गदर्शन व उपचार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली व्हावे या हेतूने वैभववाडी येथे शुक्रवार २४ एप्रिल रोजी अर्जुन रावराणे विद्यालयात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कोल्हापूर येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. व मोफत तपासणी अंती रुग्णांना उपचारासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
या आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉईडचे आजार, पोट विकार, किडनी विकार, मेंदू विकार, छातीचे आजार, हृदयरोग, स्तनातील गाठ, गर्भाशयाचे आजार, अनियमित रक्तस्त्राव, कर्करोग, व्हेरिकोज व्हेन्स, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, गर्भाशयातील फायब्रॉइड, रक्तवाहिन्यांचे आजार, लहान मुलांचे आजार, ब्लड शुगर अशा सर्व समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन व उपचार या शिबिरात करण्यात येणार आहे. तरी वैभववाडी पंचक्रोशीतील सर्व रहिवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी 9309858578, 9420104616, 9403364060, 9988776655 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.












