कणकवली (प्रतिनिधी) : असलदे उगवतेवाडी येथे सावरीचे पाणी या ठिकाणी आज सकाळी एक अपघात टळल्याची घटना घडली. शिरगांव मार्गे कोल्हापूरकडे चिरे वाहतूक करणारा ट्रक (MH09BC 9816) जात असताना अचानक पुढील टायर फुटला. टायर फुटल्यामुळे ट्रकचा ताबा सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या मार्गालगत घर आणि दुकान असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आला. घटनेनंतर काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.















