Breaking News

दारूबंदीच्या गावात गोवा बनावटीच्या दारूचा धंदा; ग्रामस्थांचा संताप अनावर, विक्रेत्याला भर चौकात विचारला जाब

“गावात दारू विकायची हिंमत कशी झाली?” – ग्रामस्थांचा सवाल; पोलिस कारवाईनंतर विक्रेत्याची जाहीर माफी

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव मंजूर करूनही गेली अनेक वर्षे गोवा बनावटीच्या अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप मंगळवारी उफाळून आला. नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयितांना ग्रामस्थांनी भर चौकात जाब विचारत चांगलीच कानउघाडणी केली.


असलदे शिवाजीनगर येथे संशयित अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊनवर कणकवली पोलिसांनी धाड टाकून मोठा दारूसाठा जप्त केला होता. त्यानंतर गावातील नागरिक, सरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत अवैध दारू व्यवसायाविरोधात आक्रमक झाले.

“गावात दारूबंदी असताना दारू विकायची हिंमत कशी झाली?”, “अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत, त्याला जबाबदार कोण?”, “विषारी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, त्याची जबाबदारी कोण घेणार?” अशा संतप्त प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला. गावातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि युवकांचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर, दयानंद हडकर, शत्रुघ्न डामरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या रोषापुढे संशयित अवधूत वाळके यांनी दारू विक्री करत असल्याची कबुली देत गावाची जाहीर माफी मागितली. “यापुढे मी गावात गोवा बनावटीची दारू विक्री करणार नाही,” असे त्यांनी सर्वांसमोर सांगितले.

दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार भगवान लोके यांनी दिला. तर “दारूबंदीच्या निर्णयाला हरताळ फासणाऱ्यांना गाव कदापि सहन करणार नाही,” असा इशारा सरपंच चंद्रकांत डामरे यांनी दिला आहे. असलदे ग्रामस्थांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावात दारूबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.