खारेपाटण परिसरातही चालतो तीन पत्ती जुगार.. जुगाराला फुटले पेव
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीन पत्तीचा जुगार रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्हा मुख्यालयाच्या इतक्या जवळपास उघडपणे जुगार अड्डा चालतोय, ही बाब नागरिकांमध्ये तीव्र आश्चर्य आणि संताप निर्माण करणारी आहे.
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली असताना, मुख्यालय परिसरातच असा प्रकार सुरू राहणे म्हणजे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. “पोलीस करताहेत काय? कोणाचा हप्ता सुरू आहे का?” असा थेट सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
याचबरोबर खारेपाटण परिसरातही दुसरा जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असा हा प्रकार सुरू असून, कायद्याची भीती उरली आहे का, असा सवाल उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे, या अवैध धंद्यांचा भांडाफोड सातत्याने होत असतानाही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. उलट, भांडाफोड करणाऱ्यांवरच वक्रदृष्टी टाकली जाते, अशीही चर्चा आहे. मात्र, अशा प्रवृत्तीसमोर आम्ही कधीही झुकणार नाही, असा निर्धार जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या सावलीत जुगार अड्डे चालणे ही केवळ कायद्याची थट्टा नसून, तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेणारी गंभीर बाब आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाला कडक निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिंधुदुर्गात अवैध धंद्यांना आळा बसणार की ‘अंदर की बात’च पुढे येणार? आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कारवाईकडे लागले आहे.












