७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. त्याअंतर्गत विद्यामंदिर हायस्कूल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यम तसेच विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उत्कृष्ट चित्र साकारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले असून चित्र पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि भविष्यात चांगले कलाकार घडावेत, या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रविवारची सुट्टी असूनही विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल मांजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच राणे सर, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नगरसेवक संकेत नाईक व स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांची ही सुरुवात असून पुढे पाककला स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जुलै रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संकेत नाईक व स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा चित्रकला स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळून त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. भविष्यात चांगले कलाकार घडण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.














