Breaking News

व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर भरबाजारात पत्नीचा कोयत्याने निघृण खून!

आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट’ असा इशारा देत आरोपीचा रक्तरंजित थरार

मध्यस्थी करणाऱ्यांनाही दिली धमकी, घटनेनंतर फरार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने हादरले. चारित्र्याच्या संशयातून पतीने भरगर्दीच्या बाजारपेठेत पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करून तिची निघृण हत्या केली. या घटनेपूर्वी आरोपीने व्हॉट्सअॅप स्टेटसवर “आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट” असा संदेश ठेवला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

मृत अमृता कांबळे (वय ३०) या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी आल्या असताना आरोपी दीपक कांबळे (वय ३५, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) तेथे पोहोचला. दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर काही क्षणांत हिंसाचारात झाले. आरोपीने जवळील धारदार कोयता काढून अमृता यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार केले. भर पावसात भररस्त्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेदरम्यान काही धाडसी नागरिकांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, “ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका,” असे म्हणत त्याने त्यांनाही दूर सारले आणि पुन्हा अमृता यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर “विषय संपवला” असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या निघृण हत्येमुळे पेठवडगावसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.