Breaking News

पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये येऊ देणार नाही – मंत्री नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.

ते म्हणाले, “देवगड हे एक कुटुंब आहे. भविष्यात कोणताही प्रकल्प प्रस्तावित असेल, तर सर्वांना विश्वासात घेऊन त्याची सविस्तर माहिती घेतली जाईल. स्थानिक नागरिकांना जे योग्य वाटेल आणि देवगडच्या हिताचे असेल, तीच आमची भूमिका असेल.”

सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर, खोटे व दिशाभूल करणारे संदेश पसरवून नागरिकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “ज्यांच्या मनात कोणतीही शंका असेल, त्यांनी थेट सरकार किंवा आमच्याशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, “सध्या देवगडमध्ये कोणता प्रकल्प येणार आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडेही नाही. अणुऊर्जा प्रकल्प येत असल्याच्या चर्चाही पूर्णपणे निराधार आहेत.”

पुढे ते म्हणाले, “देशविरोधी आणि परदेशी शक्ती विविध अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्यासाठी अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, देवगडच्या जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. देवगडच्या पर्यावरणाचे व हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.”