Breaking News

वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा

एमएच ०७ वाहनांसाठी ओसरगाव टोलवर विशेष लेन

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला भेट देत पालकमंत्री नितेश राणे यांनी ओसरगाव येथील प्रस्तावित टोलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील एमएच-07 क्रमांकाच्या वाहनांसाठी टोल नाक्यावर विशेष लेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लाईव्ह संवादातून जनतेशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गच्या जनतेने, तसेच भारतीय जनता पक्षाला नेहमीच मतांच्या माध्यमातून भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या अडी-अडचणी सोडवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

ओसरगाव टोलच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये मोठी नाराजी असल्याचे लक्षात घेऊन या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आपण दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत आज सिंधुदुर्गकरांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-07 क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र विशेष लेन ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना टोल पार करताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच पिवळ्या क्रमांकाच्या (व्यावसायिक) वाहनांसाठी संबंधित कंपनीकडून 50 टक्के टोल सवलत जाहीर करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

“माझ्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गच्या जनतेच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न सोडवता आला, यापेक्षा मोठी भेट माझ्यासाठी असू शकत नाही,” असेही राणे यांनी नमूद केले.

या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी शक्यतो एमएच-07 क्रमांकाच्या वाहनांमधून प्रवास करावा, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.