पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, कौशल्य विकास आणि स्वच्छ पर्यटनासाठी तळेरेतील विद्यार्थ्यांची प्रभावी जनजागृती
तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त, कौशल्यसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने “सक्षम सिंधुदुर्ग” या विषयावरील जनजागृतीपर पथनाट्य नुकतेच उत्साहात सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून व्यसनमुक्ती, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ पर्यटन, सामाजिक जबाबदारी आणि युवकांच्या सकारात्मक सहभागाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविला. शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाची जोड देणे ही काळाची गरज असून सक्षम आणि जागरूक युवकच उद्याचा सक्षम सिंधुदुर्ग घडवू शकतात, हा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.
व्यसनमुक्त, कौशल्यसंपन्न आणि जबाबदार युवा पिढी घडविण्याच्या उद्देशाने उपक्रम या पथनाट्याची निर्मिती माजी बांधकाम अधिकारी अजयकुमार सर्वगोड साहेब यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून साकारली. पथनाट्य सादर करताना सामाजिक कार्यकर्त्या श्रावणी मदभावे यांनी सांगितले की, “व्यसनमुक्त, कौशल्यसंपन्न आणि जबाबदार युवा पिढी घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी संकल्पना दिल्याबद्दल अजयकुमार सर्वगोड साहेब यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
समाजहितासाठी, व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा संदेश देणारे विद्यार्थी कौतुकास पात्र- जयप्रकाश परब यावेळी उपस्थित प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “आज अनेक युवक मोबाईलमध्ये व्यस्त असताना समाजहितासाठी, व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि जिल्ह्याच्या विकासासाठी संदेश देणारे हे विद्यार्थी इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. सक्षम सिंधुदुर्ग घडविण्यासाठी अशा जागरूक युवकांची आवश्यकता असून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होणे गरजेचे आहे.” त्यांच्या या शब्दांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘सक्षम सिंधुदुर्ग” चा संदेश जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी हे पथनाट्य जिल्हाधिकारी महोदया, पोलीस प्रशासन, पालकमंत्री तसेच विविध शासकीय विभागांसमोर सादर करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, पर्यटनस्थळे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हे पथनाट्य सादर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचविण्याचा मानस ही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या पथनाट्यात तळेरेतील श्रावणी कंप्युटर चे विद्यार्थी दीपेश पाष्टे, मंथन राणे, दुर्वास पवार, मृणाल मुनगेकर, आदिती गुरव, सृष्टी धुरी, पूजा आयरे, अर्पिता ओटवकर, आर्या इंदप, स्पर्शिका मदभावे, मेधांश मदभावे आणि शिवानी राणे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार अभिनयातून सामाजिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमास तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, पत्रकार निकेत पावसकर, महिला व्यापारी संघटनेच्या उपाध्यक्ष सौ. रेश्मा तळेकर, स्व. सुनील चारिटेबल ट्रस्ट व वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, सतीश मदभावे, सामाजिक कार्यकर्ते, साक्षी तळेकर, नेत्रा पावसकर तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे, विषयाच्या सामाजिक महत्त्वाचे आणि युवकांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक करत अशा जनजागृतीपर उपक्रमांना भविष्यात अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.













