कौशिक राणेचे रौप्य, समृद्धी साटमची दोन कांस्य पदकांवर मोहोर
कणकवली (प्रतिनिधी) : नेपाळमधील काठमांडू येथे नेपाळ शोतोकोन कराटे असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या दोन युवा कराटेपटूंनी उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत कौशिक संदीप राणे याने ४० किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले, तर समृद्धी उमेश साटम हिने दमदार कामगिरी करत दोन कांस्य पदके आपल्या नावे केली.
आंबोली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या या दोन्ही कराटेपटूंना प्रशिक्षक सोनू जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे हे यश मानले जात आहे. समृद्धी साटम हिने यापूर्वीही मुंबई तसेच कर्नाटकातील इंडी, विजापूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
नेपाळमध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कौशिक राणे व समृद्धी साटम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कणकवली तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.













