कणकवलीत ६ मे पासून श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन व गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवली तर्फे सालाबादप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे, नूतन श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. हा त्रिदिवसीय सोहळा बुधवार ६ मे ते शुक्रवार ८ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

मिरवणुकीने होणार सोहळ्याचा प्रारंभ

सोहळ्याचा प्रारंभ बुधवार, दि. ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य सवाद्य मिरवणुकीने होईल. श्री गणेशमूर्ती आणि कलशाची ही मिरवणूक पटवर्धन चौक, बाजारपेठ, पटकीदेवी मार्ग आणि प. पू. भालचंद्र महाराज मठ मार्गे श्री चौंडेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गुरुवार, ७ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री गणेश मंदिराची वास्तुशांती व मूर्तीवरील धार्मिक विधी पार पडतील. रात्री ९ वाजता मुलांचा शैक्षणिक बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला असून, त्यानंतर रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील.

प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसाद

शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी होतील. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा मांडण्यात येईल. दुपारी १२ वाजता आरती होऊन दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्व भाविकांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.