Breaking News

दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; तीन महिन्यांत सेवा सुरू होणार!

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन; आरोग्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्याला जनतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत हे रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी दिली. शुक्रवार, ११ जून रोजी आ. केसरकर यांनी रुग्णालयाच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित शासकीय अधिकारी आणि अभियंत्यांशी कामाच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्याच भागात दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रुग्णालयाच्या प्रलंबित कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. ही गरज ओळखून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला. याबद्दल आ. केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. या रुग्णालयामुळे दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा किंवा इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयात सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपकरणे आणि पुरेसे मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती

परिसरातील आरोग्य सुविधांचा उल्लेख करताना आमदार केसरकर म्हणाले की:

डायलिसिस सेवा ही सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांमध्ये आता डायलिसिस सेवा सुरू झाली असून किडनीच्या रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

दोडामार्गमध्ये ‘आयुष’ विभागाचे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, जेणेकरून स्थानिक पातळीवर निसर्गोपचार पद्धतीचा लाभ मिळेल.

इतर शासकीय इमारती सहा महिन्यांत पूर्ण करा

या दौऱ्यात आ. केसरकर यांनी तालुक्यातील इतर विकासकामांचाही आढावा घेतला. पंचायत समितीची नवीन इमारत, नगरपंचायत इमारत आणि क्रीडा संकुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करून, पुढील सहा महिन्यांत ते जनतेसाठी खुले करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या पाहणी प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार राहुल गुरव, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

२८ जूनला आमसभा घेण्याच्या सूचना

तालुक्यातील विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या थेट समस्या जाणून घेण्यासाठी २८ जून रोजी आमसभेचे आयोजन करावे, अशा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना दिल्या आहेत.