सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना केवळ ‘बचत गट’ या मर्यादित स्वरूपात न ठेवता, त्यांना एक सक्षम ‘इंडस्ट्री’ (उद्योग) म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढाकार घेत आहे. या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक सभागृहात जिल्ह्यातील ३७ महिला औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
महिला उद्योजिकांना नवीन दिशा
या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांनी आता आपल्या कार्यपद्धतीत व्यावसायिक बदल करण्याची वेळ आली आहे. “प्रत्येक संस्थेने आपल्या परिसरातील उपलब्ध संसाधने, बाजारपेठेची मागणी आणि स्थानिक कौशल्ये यांचा विचार करून उत्पादनांची निवड करावी. सर्वच संस्थांनी एकच उत्पादन न घेता, वैविध्यपूर्ण उत्पादनांवर भर दिल्यास पुरवठा साखळी अधिक बळकट होईल आणि वाहतुकीचा खर्चही वाचेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील महिला संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत मांडण्यात आले:
क्लस्टर निर्मितीः चार ते पाच संस्थांनी एकत्र येऊन एकच व्यवसाय निवडावा आणि क्लस्टर (समूह) तयार करावा.
५० संस्थांचे लक्ष्यः जिल्ह्यात किमान ५० महिला औद्योगिक संस्थांचे नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आठ तालुक्यांचे पाच विभागः प्रशासकीय सोयीसाठी आठ तालुक्यांचे पाच विभाग पाडण्यात यावेत.
एकात्मिक मार्केटिंग: मार्केटिंग, कोल्ड
स्टोरेज, ब्रँडिंग आणि प्रोसेसिंग या सर्व प्रक्रिया एकत्रित करून उत्पादने बाजारात आणल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ मिळेल.
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. नीता राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, जिल्हा नाबार्ड प्रबंधक सौ. दिपाली माळी, रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधी श्रीम. बेनझीर शेख आणि सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. ऋषिकेश गावडे उपस्थित होते.
या बैठकीमुळे जिल्ह्यातील महिलांच्या लघुउद्योगांना एक नवी दिशा मिळणार असून, लवकरच सिंधुदुर्गातील महिलांच्या उत्पादनांना एक ‘ब्रँड’ म्हणून नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.













