आयुष्मान भारत योजनेचा विस्तार; सिंधुदुर्गात खाजगी रुग्णालयांतही मोफत उपचार उपलब्ध

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आता सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्येही महागडे उपचार मोफत मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, प्रशासनाकडून अद्ययावत यादी जाहीर करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच मिळते. यामध्ये औषधे, शस्त्रक्रिया, निदान तपासण्या तसेच रुग्णालयातील वास्तव्याचा खर्च समाविष्ट आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांचा सहभाग वाढल्यामुळे आता नागरिकांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबई येथे जाण्याची गरज कमी होणार आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, गंभीर आजारांवरील उपचार आता स्थानिक पातळीवरच, तेही एकाही रुपयाचा खर्च न करता घेता येणार आहेत.
जिल्ह्यातील समाविष्ट प्रमुख खाजगी रुग्णालये :
कुडाळ :
सुधा हॉस्पिटल
कोकण कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
कणकवली :
संजीवन हॉस्पिटल
गुरुकृपा हॉस्पिटल
एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाइफटाईम हॉस्पिटल
डॉ. नागवेकर हॉस्पिटल अँड नर्सिंग होम
विवेकानंद नेत्रालय
श्रीराम हॉस्पिटल आणि मॅटरनिटी होम
सावंतवाडी / नेरूर :
डॉ. गोडे आय केअर सेंटर
चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर
यश हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर
पर्यवंतर नाईक रूरल हॉस्पिटल
मालवण / देवगड :
अंकुर हॉस्पिटल
झांटे क्लिनिक

नागरिकांनी काय करावे?

उपचारासाठी जाताना ‘आयुष्मान कार्ड’ सोबत ठेवणे आवश्यक.

संबंधित रुग्णालयातील ‘आयुष्मान मित्र’ यांच्याशी संपर्क साधून उपचार प्रक्रिया समजून घ्यावी.

कार्ड नसल्यास जवळच्या सेवा केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन पात्रता तपासून घ्यावी. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरत आहे.