गृहिणींचे बजेट कोलमडले : गॅस महागला

आखाती युद्धातील झळा बसायला सुरुवात : सरकार तोडगा काढण्यात अयशस्वी

मुंबई (प्रतिनिधी) : आज ७ मार्च २०२६ पासून भारतात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडर ₹६० ने महागला आहे तर १९ किलो व्यावसायिक सिलेंडर ₹११५ ने महागला आहे. ही वाढ देशभर लागू झाली असून अनेक शहरांमध्ये नवीन दर लागू झाले आहेत. केंद्र सरकार या दरवाढिवर योग्य तोडगा काढू न शकल्याने आता गॅस च्या किंमतीवर त्यांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होतं आहे.

उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत सुमारे ₹८५३वरून १९१३ झाली, तर मुंबईतही किंमत सुमारे १९१२ च्या आसपास पोहोचली आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा पुन्हा घाला बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ₹६० ची वाढ झाल्याने गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बजेटवर परिणाम होणार आहे. आधीच वाढलेल्या महागाईत आता स्वयंपाकाचा खर्चही वाढणार आहे.

जागतिक पातळीवरील ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील तणावामुळे इंधनाच्या किमती वाढल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे गॅसच्या दरात ही वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा झळ बसली असून महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.