Breaking News

नगरपालिकेचा बेजबाबदारपणा! पाण्याअभावी सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा; रुग्ण आणि महिलांचे हाल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील उभा बाजार परिसरातील औदुंबर प्लाझा समोर असलेले नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याअभावी अस्वच्छतेचे केंद्र बनले असून, प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर दुर्भाटकर यांचे क्लिनिक असल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर महिला आणि रुग्णांना या अस्वच्छतेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे; बाजूलाच हॉटेल्स आणि लॉज असूनही पालिका प्रशासनाचे या भीषण परिस्थितीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. “शहराच्या मुख्य भागातच जर नागरिकांना अशा घाणीचा सामना करावा लागत असेल, तर पालिकेचा स्वच्छता विभाग नक्की करतोय काय?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी उपस्थित केला असून, तातडीने पाण्याची सोय आणि स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.