आंबोली घाटातील रस्ते ठरताहेत वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा वाढत्या वाहनवेगामुळे दुर्मिळ प्रजातींचा बळी

संरक्षणासाठी तातडीच्या उपायांची मागणी

आंबोली (प्रतिनिधी) : जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाट परिसरात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक दुर्मिळ प्राणी रस्त्यावर चिरडले जात आहेत. त्यामुळे हा निसर्गसमृद्ध घाटमार्ग वन्यजीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा मार्ग बनत चालला आहे.

घाटातील वळणावळणाच्या रस्त्यांवर दिवस-रात्र पर्यटकांची, खासगी वाहनांची आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रहदारीतून रस्ता ओलांडणारे साप, बेडूक, घोरपड, सरडे, साळिंदर, माकडे, खेकडे आणि इतर अनेक जीव वाहनांच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडत आहेत.

विशेषतः पावसाळ्यात या घटनेत मोठी वाढ होते. आंबोली परिसरातील ओलसर हवामानामुळे अनेक उभयचर आणि सरीसृप प्रजाती रात्री रस्त्यावर येतात. मात्र भरधाव वाहनांमुळे त्यांना जीव गमवावा लागत आहे.

निसर्गप्रेमी, संशोधक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वन्यजीव संवेदनशील पट्टयांमध्ये वेगमर्यादा लागू करणे, स्पीड ब्रेकर बसविणे, इशारा फलक उभारणे, तसेच चालकांमध्ये जनजागृती करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.

निसर्ग अभ्यासकांच्या मते, “आंबोलीची ओळखच जैवविविधतेमुळे आहे. हीच जैवसंपदा अशाच प्रकारे नष्ट होत राहिली तर भविष्यात अनेक दुर्मिळ प्रजाती कायमच्या अदृश्य होतील.”