आगळावेगळा वाढदिवस; उत्सुकता शिगेला
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी कुडाळ एस.टी. डेपोच्या मैदानावर भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. मात्र, यंदा या सोहळ्याचे स्वरूप कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नसून, केवळ जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह असे ‘आगळेवेगळे’ असेल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळात बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. बजेट असो, वनसंज्ञेचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे नुकसान, प्रत्येक विषयावर त्यांनी आक्रमकपणे आवाज उठवला आहे. “खासदार नारायण राणे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून दोन्ही बंधू (निलेश आणि नितेश राणे) जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत,” असे सामंत यांनी यावेळी नमूद केले.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाबाबत बोलताना दत्ता सामंत म्हणाले की, “आमचे विरोधक नेहमी म्हणतात की सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गर्दी होते. परंतु, यंदा आम्ही कोणताही ऑर्केस्ट्रा किंवा नाट्यप्रयोग ठेवलेला नाही. निलेश राणे यांच्या कार्याला ऊर्जा आणि प्रोत्साहन देण्यासाठी जनता आणि कार्यकर्ते स्वतःहून आशीर्वाद देण्यास उपस्थित राहणार आहेत. हेच या वाढदिवसाचे वेगळेपण आहे.”
या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार किरण सामंत, आमदार दीपक केसरकर, तसेच महायुतीचे नेते प्रमोद जठार, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यांनी सर्व पत्रकार आणि हितचिंतकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कुडाळ एमआयडीसी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला दादा साईल, दीपक नारकर, रुपेश कानडे, नागेश आईर, दीपलक्ष्मी पडते, विनायक राणे, संजय पडते, मिलिंद नाईक, प्राजक्ता बांदेकर, विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, संग्राम साळसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.












