दोन वृद्ध घरातच मृतावस्थेत

सावंतवाडी शहर, माजगाव येथील घटना

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहर आणि परिसरात दोन वृद्धांचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शहरातील झिरंग-म्हाडा कॉलनी येथील सुभाष नारायण नाईक (७९) आणि माजगाव-मेटवाडी येथील रहिवासी चंद्रकांत सीताराम वाडकर (८५) अशी मृतांची नावे आहेत.

झिरंग-म्हाडा कॉलनी येथे सुभाष नाईक व त्यांची पत्नी असे दोघे वृद्ध दोन वर्षांपासून राहतात. पत्नी मानसिक रुग्ण आहे. तर सुभाष नाईक हे आजारी होते. त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था बाहेरून केली होती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या त्यांना नाष्टा देण्यासाठी नेहमीप्रमाणे एक महिला आली असता घराच्या खिडकीतून उग्र वास येऊ लागला. तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता सुभाष नाईक हे जमिनीवर झोपलेल्या स्थितीत आढळून आले. घटनेची माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनाही कळविले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी जाऊन खातरजमा केली. तेव्हा सुभाष नाईक मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.

दुसरी घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजगाव-मेटवाडी येथे उघडकीस आली. चंद्रकांत सीताराम वाडकर (८५) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत वाडकर हे चार-पाच वर्षांपासून एकटेच राहत होते. त्यांचे मुलगे इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे राहतात. रविवारी त्यांचे मुलगे आले असता घरातून कुजकट वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार मनोज राऊत, मंगेश शिंगाडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचा मागील दरवाजा तोडला. तेव्हा वाडकर हे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळले.