कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावी (PCB व PCM) विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन, सराव व आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.
या क्रॅश कोर्सचा उद्घाटन समारंभ दिनांक १६ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक असलेली तयारी, वेळेचे नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. ओंकार साळवी यांनी सीईटी कोचिंग सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांना या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
अॅडमिशन इन्चार्ज प्रा. सचिन मेस्त्री व प्रा. इमरान पटेल यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना या उपक्रमाची माहिती दिली तसेच शेवटी उपस्थितांचे आभार मानले. या क्रॅश कोर्सला सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे.
या कोर्सअंतर्गत विषयानुसार नियोजनबद्ध अध्यापन, महत्त्वाच्या संकल्पनांचे सुलभीकरण, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तसेच शंका निरसन सत्रे आयोजित केली जात आहेत. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांची तयारी अधिक भक्कम करण्यावर भर दिला जात आहे.
एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्सला प्रा. भाग्यश्री आरावकर, डॉ. एम. के. साटम, डॉ. एस. टी. माने, डॉ. ए. पी. पाटील, प्रा. एस. एस. गावडे, प्रा. ए. व्ही. कुडतरकर आणि प्रा. सावंत हे अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.
क्रॅश कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सराव परीक्षा (Practice Test) लक्ष्यवेध २०२६ आयोजित करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.












