कासार्डे (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील कासार्डे – जांभूळवाडी मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. जि.प. शाळेसमोरून जात असताना मालवाहू कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट शाळेच्या कंपाऊंडमध्ये घुसला. ही घटना रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसली तरी कंटेनरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.













