तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुका व्यापारी संघ, वैभववाडी तालुका व्यापारी संघ यांच्या विद्यमाने आणि आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित महाराष्ट्र शासनाचा अन्न सुरक्षाविषयक FOSTAC (Food Safety Training & Certification) हा प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. स्मित लॉन्स, तळेरे येथे आयोजित करण्यात आला आहे. संबंधित परवानाधारक व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार प्रत्येक अन्न व्यवसायाशी संबंधित संस्थेत प्रमाणित व्यक्ती असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने खाद्य पदार्थ संबंधित व्यवसाय असणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिक, खानावळ, फरसाण, बेकरी, मिठाई व इतर खाद्य पदार्थ, शितपेय, कोकणी मेवा, पाणीपुरी स्टॉल, दूध, वडापाव गादी, पान स्टॉल, किराणा व्यापाऱ्यांसाठी व ज्यांना फुड लांयसन्स लागतं, त्या सर्व व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आणि आवश्यक केले आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने अन्न सुरक्षा नियमांची योग्य माहिती देण्यात येणार आहे. व्यवसायातील गुणवत्ता व सुरक्षितता वाढण्यास मदत, दंड व कायदेशीर अडचणी टाळता येतील, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो, परवाना नूतनीकरण प्रक्रिया सोपी होते. जिल्हयातील सर्व अन्न व खाद्यपदार्थ वितरकांनी या महत्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये नियमांच्या अधीन राहून अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील आणि तळेरे दशक्रोशीतील व्यापार, व्यावसायिकांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर आणि वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेरकर, आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार यांनी केले आहे.












