पांग्रड महादेव मंदिर तलाव सुशोभीकरणासाठी ४.५० कोटी मंजूर

१२ एप्रिलला आमदार निलेश राणेंच्या हस्ते भूमीपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पांग्रड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येथील ऐतिहासिक श्री महादेव मंदिर तळी (तलाव) पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी प्राप्त झाला असून, या विकासकामाचा पायाभरणी समारंभ रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

पांग्रड गावच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या या तलावाचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी श्री. संतोष मर्गज यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, आता या निधीतून तलावाचा कायापालट होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पांग्रड परिसरात यापूर्वीही अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. आता या भव्य पर्यटन प्रकल्पामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास पांग्रड ग्रामस्थ मंडळाने व्यक्त केला आहे. या भूमीपूजन सोहळ्याला पांग्रड ग्रामस्थ मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे पांग्रडच्या पर्यटन नकाशावर एक नवे आकर्षण निर्माण होणार आहे.