कोल्हापुरात १३ मार्च रोजी भव्य ‘रोजगार मेळावा’

हजारो तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी : विनामूल्य नोंदणी आणि जागेवरच मिळणार नियुक्तीपत्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विवेकानंद महाविद्यालय आणि युवाशक्ती फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

सावंतवाडी( प्रतिनिधी) : बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), कोल्हापूर विभागीय केंद्र, विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) आणि युवाशक्ती फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १३ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा पार पडणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

विविध क्षेत्रांतील संधी आणि आकर्षक विद्यावेतन

या मेळाव्याद्वारे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, सीएनसी मशिनिंग, फार्मा, केमिकल, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक आणि टेक्सटाईल यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान १५,००० ते ३०,०००
रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाईल. तसेच निवास, भोजन आणि वाहतुकीबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

यासाठी

वयोमर्यादाः १८ ते ३५ वर्षे.

शिक्षणः १० वी, १२ वी उत्तीर्ण, पदविका (Diploma), पदवी (Degree), पदव्युत्तर पदवी (PG) आणि व्यावसायिक पदवीधारक.

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कोणत्याही विद्यापीठातील पात्र विद्यार्थी व बेरोजगार युवक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

विनामूल्य नोंदणी प्रक्रिया

या मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी खालील लिंकवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे:

नोंदणी लिंकः

https://forms.gle/U77MWgbTPnuwdHbX9

“राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तरुणांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,” असे आवाहन वायसीएमओयूचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. (डॉ.) आर. व्ही. कुलकर्णी आणि सावंतवाडी अभ्यास केंद्र प्रमुख तुषार वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

युवाशक्ती फाऊंडेशन गेल्या १० वर्षांपासून कौशल्य विकास आणि ऑन-जॉब ट्रेनिंग क्षेत्रात कार्यरत असून, या मेळाव्याच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे.