सावंतवाडी कारागृह भिंत उभारणीसाठी ४ कोटी मंजूर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील संस्थानकालीन वारसा असलेल्या जिल्हा कारागृहाच्या भिंत उभारणीसाठी ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पावसात कोसळलेली कारागृहाची भिंत आता उभारण्यात येणार आहे. संपूर्ण कारागृहाची धोकादायक झालेली भिंत आता उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पावसाळ्यामध्ये कोसळल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या संरक्षक भिंतीचे शासनाने स्टक्चलर ऑडिट केले होते. सदरची भिंत सुमारे १४३ वर्ष जुनी असल्याने सदर संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी भेगा गेल्याने जीर्ण झालेली असून ती पाडून नव्याने आर. सी. सी. भिंत बांधण्याबाबत अहवाल सादर केला होता. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी तसा परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह अप्पर पोलीस महांसचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र-पुणे यांच्याकडे सादर केला. राज्याच्या गृह विभागाने ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये एवढ्या रकमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सदर काम मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आमदार केसरकर यांनी आभार मानले.