कणकवली (स्वप्निल तांबे) : हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठाचा ७ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी भारतातील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी यांच्या प्रतीकात्मक मूर्तीचे दर्शन व भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ५ वाजता गणेश पूजन, पादुका पूजन, अभिषेक आणि होम-हवन याने होणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता तिरुपती बालाजी देवतांचे दर्शन आणि उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पुढील कार्यक्रमांमध्ये सकाळी १० वाजता लघुरुद्र व कुंकूअर्चन, दुपारी १२ वाजता पालखी सोहळा, तसेच दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार आहे. भाविकांसाठी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. रात्री ७ ते १० वाजेपर्यंतही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भाग म्हणून रात्री ७ ते ९ वाजता ‘आई पावनादेवी समर्थ नृत्य’ सादर होणार असून रात्री ९ वाजता ‘रात्रीस खेळ चाले’ हे लोकनाट्य हरिहरेश्वर सेवा मंडळ, मुंबई यांच्या कलाकारांकडून सादर करण्यात येणार आहे
या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिरुपती बालाजींचे दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ हडपिड यांनी केले आहे.













