कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई कुर्ला येथून देवगडला येण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाची दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने रेल्वे प्रवासात लंपास केली. यामध्ये जुन्या किमतीनुसार २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५०० रुपयांची हँडबॅग असा एकूण २ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राकेश मिठबावकर हे आपल्या पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एलटीटी- मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडला येण्यासाठी निघाले होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर आली. यावेळी गाडीतून उतरण्यासाठी सामानाची आवराआवर करत
असताना, त्यांना दागिन्यांची एक बॅग गायब असल्याचे लक्षात आले. बॅग चोरीला गेल्याचे समजताच त्यांनी संपूर्ण डब्यात शोध घेतला, मात्र बॅग मिळून आली नाही. तोपर्यंत गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचली होती. त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने पोलिसांनी त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
यामध्ये १ लाख ८० हजार रुपये किमतीचे (३२ ग्रॅम) मंगळसूत्र, ६० हजार रुपये किंमतीची (१० ग्रॅम) सोन्याची चैन, १० हजार रुपये किंमतीचे (३ ग्रॅम) छोटे मंगळसूत्र व ५०० रुपये हँडबॅग असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे नमुद आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












