तळेरे बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अस्मिता तळेकर आक्रमक.!

प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, याकडे एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी आवाज उठवला असून प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तळेरे हे कोल्हापूर – कणकवली प्रवासातील मुख्य मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. मात्र, येथील बस स्थानकातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. प्रसाधनगृहांना दरवाजे नसल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी सांडपाणी तुंबून बाहेर वाहत असल्याचे चित्र आहे. या भीषण वास्तवाचे व्हिडीओ प्रसिद्ध करत अस्मिता तळेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “एकीकडे प्रवाशांकडून कर घेतला जातो, मात्र त्यांना साध्या आरोग्यदायी सुविधा दिल्या जात नाहीत. महिलांना सुरक्षितपणे स्वच्छतागृहाचा वापर करता येत नसेल, तर हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे,” असा आरोपही तळेकर यांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हे वास्तव त्यांच्या समोर मांडणार आहेत. आता अस्मिता तळेकर यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर तरी एसटी प्रशासन तळेरे बस स्थानकाचा तसेच स्वछतागृहांची दुरुस्ती करणार का ? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.