वैभववाडीत शिकारीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वैभववाडी ( प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिकारीसाठी गेलेल्या काही जणांमध्ये अचानक गोळीबार झाला असून यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील आर्चिणे गावातील काही नागरिक शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनुलकर यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू असून गोळीबार नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे आर्चिणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.