वागदेत समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने ‘समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहे. एका दिवसाच्या शिबिराने सर्व प्रश्न सुटणार नाहीत याची आम्हाला जाणीव आहे. मात्र हा एक स्तुत्य प्रयत्न असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाले, त्यावेळी श्री. कातकर बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हापरिषद सदस्या शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, अक्षता राणे, वागदे सरपंच संदीप सावंत तसेच वागदे मंडळमधील सगळे सरपंच, महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

दीक्षांत देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. संदीप सावंत यांनी राज्य सरकार व पालकमंत्री नितेश राणे यांचे अभियान आयोजित केल्याबद्दल आभार मानले. शिबीरासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. वागदे मंडळातील मंडळ अधिकारी किरण गावडे व तलाठी श्रद्धा कोरगावकर यांनी शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे तसेच रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.